''अन्नधान्य क्रांतीमध्ये शेतकऱ्यांचे महत्त्वाचे योगदान'' - प्रधानमंत्री


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्य क्रांती घडवून आणण्यात शेतकरी हा महत्त्वाचा आधारस्तंभ असून कोविड १९च्या काळातही  शेतकऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज नवी दिल्ली इथं संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी विविध  ८ प्रकारच्या धान्यांच्या १७ प्रजाती मोदी यांनी देशाला समर्पित केल्या. तसंच ७५ रुपये मूल्य असलेल्या स्मरण नाण्याचं प्रकाशनही मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. आज जारी करण्यात आलेलं विशेष नाणं हे अन्न आणि कृषी संघटनेनं कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी दिलेल्या योगदानाप्रती १३० कोटी भारतीयांतर्फे कृतज्ञता म्हणून सादर करण्यात आलं आहे, असं मोदी यांनी नमूद केलं.

देशातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी सरकार बहुस्तरीय उपाय योजना करत असून, एकीकडे महिला आणि बालकांना सकस आहार देण्यावर भर दिला जात आहे, तर स्वच्छतेबाबतही विशेष प्रयत्न केले जात आहेत, असं मोदी यांनी सांगितलं.

नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी यावेळी केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पायाभूत सुविधांसाठी  अडीच हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.

तर पेरणीनंतर पिकाचा भाव ठरवला जाईल असं ते म्हणाले. शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील दलालांना हटवल्याने ग्राहकांना मोठा फायदा होणार असल्याचं ते यावेळी म्हणाले. आजच्या जागतिक अन्न दिवसानिमित्त मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या.