“माननीय पंतप्रधानांच्या 'फिट इंडिया संवादसत्राचा' भाग होता येणे, ही बहुमानाची बाब”- विराट कोहली.


तंदुरुस्तीबाबत उत्साही व्यक्तींशी पंतप्रधानांच्या उद्या होणाऱ्या फिट इंडिया संवादसत्रातील मनोगतांची, सुप्रसिद्ध तंदुरुस्त व्यक्तींनी दिली किंचितशी झलक


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता 'फिट इंडिया संवादसत्रात', तंदुरुस्तीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या प्रभावी व्यक्तींशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत. केंद्रीय युवा कामकाज आणि क्रीडा मंत्री श्री.किरेन रिजिजू हेही यावेळी सहभागी होणार आहेत.


तंदुरुस्ती आणि आरोग्य याबाबत विचार मांडणाऱ्या या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, सुदृढतेविषयीचा आदर्श आणि 'आयर्नमॅन ट्रायथलॉन'चा विजेता मिलिंद सोमण, दिव्यांग ऑलिम्पिक मधील सुवर्णपदकविजेता देवेंद्र झांझरिया, आहारात स्थानिक घटकांचा समावेश करण्याविषयी आग्रही असणाऱ्या तसेच तंदुरुस्तीचे साधेसोपे उपाय सांगणाऱ्या आणि आहार व पोषणविषयक अनेक प्रसिद्ध पुस्तकांच्या लेखिका- पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर, जम्मू काश्मीरमधील महिला-फुटबॉलपटू व आता मुलींसाठी फुटबॉल प्रशिक्षक अफसान आशिक, IIT आणि MIT चे माजी विद्यार्थी आणि बिहार योगशाळेचे प्रतिनिधी स्वामी शिवध्यानम सरस्वती आणि राष्ट्रीय उत्थानावर संशोधन करणारे शिक्षणतज्ज्ञ - भारतीय शिक्षण मंडळाचे मुकुल कानिटकर यांचा समावेश आहे.


भारतातील युवकांच्या सर्वात मोठ्या आदर्शांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या विराट कोहली यांनी ट्विटरच्या माध्यमातून या सत्राबद्दलची उत्साहाची भावना व्यक्त केली आहे. "माननीय पंतप्रधानांच्या फिट इंडिया संवादसत्राचा भाग होता येणे, ही माझ्यासाठी बहुमानाची बाब आहे. यामध्ये मी तंदुरूस्तीसह आणखी काही गोष्टींविषयी बोलताना तुम्हाला दिसेन."


तंदुरुस्तीच्या बाबतीत सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असणारे आणि 'आयर्नमॅन' स्पर्धेचे विजेते मिलिंद सोमण म्हणतात, त्यांचा सुदृढतेचा मूलमंत्र फिट इंडिया संवादसत्रातून साऱ्या देशासमोर मांडण्यास ते उत्सुक आहेत. "सहज व सोप्या गोष्टींचा मी समर्थक आहे. आणि म्हणूनच आपल्या पंतप्रधानांच्या उपस्थितीत, कोणत्याही वयात तंदुरुस्त आणि आरोग्यसंपन्न राहण्यासाठीच्या साध्यासरळ उपायांबद्दल मी बोलणार आहे."- असे सदा हसतमुख असणाऱ्या भारताच्या 'आयर्नमॅन'ने सांगितले.


फिट इंडिया संवादासत्राच्या या ऑनलाईन कार्यक्रमात, सहभागी व्यक्ती त्यांच्या स्वतःच्या सुदृढतेच्या प्रवासातील अशा अनेक रंजक गोष्टी सांगतील आणि उद्बोधक सूचनाही देतील. हे संवादसत्र अत्यंत योग्य वेळी होत असून यात, पोषण, आरोग्यसंपन्नता आणि तंदुरुस्तीच्या इतर अनेक पैलूंविषयी निश्चितपणे कसदार चर्चा होणार आहे.


'सर्वांसाठी तंदुरुस्ती' या ध्येयवाक्याचा विचार करता, स्फूर्तिदायी दिव्यांग ऑलिम्पिकपटू देवेंद्र झांझरिया यांचा आरोग्याचा मूलमंत्र आणखी महत्त्वपूर्ण ठरतो. त्यांच्या सहभागाबद्दल ते सांगतात, " माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत फिट इंडिया संवादसत्रात मी, भारताच्या पॅरालिम्पिक कमिटीचे प्रतिनिधित्व करेन."


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली 'फिट इंडिया चळवळ' त्यांनी 29 ऑगस्ट 2019 रोजी सुरु केली. यामध्ये एकूण 3.5 कोटींपेक्षा अधिक भारतीयांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून भाग घेतला असून, 15 ऑगस्ट 2019 च्या फिट इंडिया फ्रीडम रन (तंदुरुस्त भारत-स्वातंत्र्य दौड) यामध्ये 2 कोटींपेक्षा अधिक जणांचा सहभाग होता. तर, 30 कोटी लोक डिजिटल माध्यमातून सहभागी झाले होते.


फिट इंडिया चळवळ आणखी पुढे नेण्यासाठी सुदृढ आरोग्य आणि तंदुरुस्ती याबद्दल नागरिकांच्या कल्पना पुढे आणण्याचा 'फिट इंडिया संवादसत्राचा' उद्देश आहे.


या संवादसत्रासाठी- https://pmevents.ncog.gov.in या NIC लिंक च्या माध्यमातून कोणालाही नोंदणी करता येणार आहे. डीडी न्यूज आणि डीडी इंडिया वाहिन्यांवरून तसेच, डिस्ने हॉटस्टार सहित काही ऑनलाईन मंचांवरून हा कार्यक्रम थेट प्रसारित केला जाणार आहे.