घटस्फोटीत मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घटस्फोटीत मुलींना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळण्यासाठीचे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत, असे केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. मुलीच्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी आणि संबधित घटस्फोट याचिका तिच्या पालक कर्मचाऱ्यांच्या किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या हयातीत असताना दाखल केलेली असल्यास ती कौटुंबिक निवृत्तीवेतन घेण्यास पात्र असेल असे सिंह म्हणाले.


निवृत्तीवेतन धारकाच्या मृत्यूनंतर दिव्यांग मुलाला किंवा भावंडांनादेखील अपंगत्वाचा दाखला सादर केल्यानंतर हे निवृत्तीवेतन मिळेल मात्र आई-वडिलांच्या मृत्यूच्या आधी अपंगत्व आलेलं असावं तरच हा लाभ मिळणार असल्याचे सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग निवृत्तीवेतनाधारकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी त्यांच्या मदतनीसासाठी दिल्या जाणाऱ्या भत्त्यात देखील दरमहा साडेचार हजार रुपयांवरून 6 हजार 700 रुपये वाढ करण्यात आली आहे.