राज्यांनी टाळेबंदीचं पुनर्मूल्यांकन करावं, तसंच आर्थिक व्यवहार सुरु राहतील याची काळजी घ्यावी - प्रधानमंत्री


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात लागू केल्या जाणाऱ्या एक-दोन दिवसांच्या टाळेबंदीचं राज्यांनी पुनर्मूल्यांकन करावं, तसंच कोरोनाविरुद्धच्या लढाईबरोबरच सर्व आर्थिक व्यवहार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. त्यांनी काल देशात कोविड-१९ चा जास्त प्रादुर्भाव असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीत सहभागी झाले होते. कोरोनाचा प्रसार रोखणं आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरु राहण्याच्या दृष्टीनं यापुढच्या काळात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र हा उपाय परिणामकारक ठरेल, असं मोदी म्हणाले.