बिहार विधानसभेची निवडणूक जाहीर



नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला ७१ जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात ३ नोव्हेंबरला ९४ जागांसाठी तर सात नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यात ७८ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी १० नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत ही माहिती दिली. निवडणूकीसाठीची आदर्श आचारसंहिता आजपासूनच लागू झाली आहे. 



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने सुरक्षित मतदानासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत. मतदानाची वेळही एक तासाने वाढवत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत केली आहे. शेवटचा तास कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवला आहे. निवडणूकीसंदर्भात समाज माध्यमांवर गैरवर्तन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही अरोरा यांनी स्पष्ट केलं.