मुंबईत आज पावसाची उघडीप


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत आज पावसानं उसंत घेतली आहे. त्यामुळं  मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बेस्ट सेवा तसेच तसेच उपनगरीय रेल्वे सेवा सुरळीत चालू आहेत. नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर ओसरला असून मधून मधून तुरळक सरी कोसळत आहेत.

गेल्या २४ तासांत ११३ पूर्णांक २२ शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यादरम्यान ऐरोली विभागात सर्वात जास्त म्हणजे १३ पूर्णांक २० शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांगली जिल्ह्यातल्या  दुष्काळी तालुक्यात वीस वर्षातला विक्रमी पाऊस यंदा झाला.

दुष्काळी खानापूर तालुक्यात ९३७, आटपाडी ७२७, जत ४९१, कवठेमहांकाळ ५६७ आणि तासगाव तालुक्यात ५९१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, कोरड्या दुष्काळातून सुटका झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता ओल्या दुष्काळाचं  संकट गडद झालं आहे.

नांदेड जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली असून स्वच्छ सुर्यप्रकाश पडला आहे. नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. नांदेड शहराजवळच्या डॉ शंकरराव चव्हाण विष्णुपूरी प्रकल्पाच्या ९ दरवाज्यांमधून ९४ हजार ४१० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत करण्यात येत आहे.

जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिध्देश्वर या धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मात्र, सद्यस्थितीत पूर नियंत्रणात आहे. जिल्ह्यातले उर्ध्व मनार आणि निम्न मनार प्रकल्प १००% भरले असून गरजेनुसार या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागानं दिली आहे.