पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ रूग्णालयातल्या लष्कराच्या डॉक्टरांनी अति गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून नवजात बाळाला दिले जीवदान


पुणे : पुण्याच्या ‘एआयसीटीएस’ म्हणजेच आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्स या सुपर स्पेशलायझेशन संस्थेमध्ये कार्यरत असणा-या डॉक्टरांच्या पथकाने एका जवानाच्या नवजात 14 दिवसांच्या लहानग्यावर अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून त्याचे प्राण वाचविले आहेत.  या बाळाच्या हृदयामध्ये जन्मतःच काही तरी दोष होता. असा दोष 22,000 जणांमधून एकाला असू शकतो. यामुळे या छोट्या बाळाच्या हृदयामध्ये ब्लॉकेज निर्माण झाले. जन्मल्यानंतर बाळाला असलेला आजार लक्षात येताच ‘एआयसीटीएस‘मध्ये या बाळाला दाखल करण्याचा सल्ला त्या जवानाला देण्यात आला होता.


या बाळाचे  हृदयाचे ठोके आणि इतर गोष्टी तपासल्यानंतर आणि कोणत्याही औषधोपचाराने त्याला बरे वाटणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर एआयसीटीएसच्या तज्ज्ञांनी त्याला कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्याचा निर्णय घेतला. इथल्या डॉक्टरांच्या पथकाने बाळाच्या पोटाच्या वरच्या भागात हा पेसमेकर बसवून तो हृदयाशी जोडला आहे. लष्कराच्या या रुग्णालयातल्या विशेष तज्ञ डॉक्टरांनी ही अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करून नवजात बाळाला जीवदान दिले आहे. आता या बाळाला रूग्णालयातून घरी पाठविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.