अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे दिशानिर्देश मान्य करणार असल्याचं गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभिनेता सुशांत सिंह आत्महत्येच्या तपासाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मान्य असतील असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपण्याचा निर्णय, केंद्र सरकारनं दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानंतर, देशमुख यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हीच्या विरोधात पाटणा इथं दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास मुंबईत वर्ग करावा यासाठी रिया हिनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

त्यावर येत्या ११ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. त्यावेळी सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल असं देशमुख यांनी सांगितलं. दरम्यान मुंबई पोलीस, या प्रकरणाचा तपास व्यावसायिक पद्धतीनं करत असल्याचंही देशमुख यांनी नमूद केलं.