एचएसएनसी समूह विद्यापीठाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्याधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतिकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या (रुसा) माध्यमातून विविध महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठ स्थापन करावे. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतील. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून पुढाकार घेण्याचे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी केले.
विद्यार्थ्यांचे आनंदाने शिक्षण व्हावे; आपत्कालीन परिस्थितीत परीक्षेपेक्षा शिक्षण सुरु राहिले पाहिजे – मुख्यमंत्री
शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण कसे सुरु राहील यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करुन परीक्षा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु राहील याकडे सर्वानी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर आनंद मिळतोच पण ते शिक्षण घेताना अधिक आनंदी राहून ते कसे यशस्वी होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एचएसएनसी समूह विद्यापीठाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.
