मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदत करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून निकषात बदल केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली, कोकणातील नुकसानग्रस्तांच्या पाठीशी हे शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य उपस्थित होते.
नुकसानभरपाईच्या निकषातील बदलांमुळे भरीव मदत
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, वादळानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेच तत्पूर्वी रायगडसाठी १०० कोटी, रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदूर्गला २५ कोटी रुपयांची मदत शासनाने जाहीर केली आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलण्याची गरज असल्याने तशा सूचना विभागाला देण्यात आल्या होत्या. या बदललेल्या निकषाप्रमाणे सर्वांना नुकसानभरपाई दिली जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बदललेल्या निकषांची सविस्तर माहिती दिली.
बदललेल्या निकषामुळे मदतीत दीड ते तीनपट वाढ
पक्क्या- कच्च्या घराच्या नुकसानीसाठी पूर्वी ९५ हजार १०० रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता दीड लाख इतकी वाढविण्यात आली आहे.
बहुवार्षिक पिकाच्या नुकसानभरपाईसाठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली होती आता ती वाढवून ५० हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. ही नुकसानभरपाई २ हेक्टरपर्यंतच्या मर्यादेत मिळेल
अंशत: पडझड झालेल्या घरासाठी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता १५ हजार रुपये इतकी करण्यात आली आहे.
कच्च्या घराच्या अंशत: नुकसानीपोटी पूर्वी ६ हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात होती ती आता १५ हजार रुपये इतकी वाढवण्यात आली आहे.
नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी ६ हजार रुपये दिले जात असत, आता ही रक्कम वाढवून १५ हजार इतकी करण्यात आली आहे.
गावात लहान मोठी दुकाने, टपरीचे व्यवसाय करणारे लोक असतात त्यांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात येईल.
ज्यांची घरे पूर्णत: क्षतीग्रस्त झाली आहेत त्यांना प्रतिकुटुंब कपड्यांसाठी पूर्वी २५०० रुपये तर २५०० रुपये भांडीकुंडी यासाठी दिले जात होते आता विशेष बाब म्हणून ही मदत वाढविण्यात आली आहे. ती कपडे व भांडी यासाठी प्रतिकुटुंब प्रत्येकी ५ हजार अशी करण्यात आली आहे.